Sunday, June 15, 2008

शिवराज्याभिषेक-३३४ वा वर्धापन दिन !



"आज सकाळपासूनच आपला "बा" लंय जोमांत हाय !" असं मनांत येताच बजाबा आपल्या बापाला म्हणजे श्रीपतीला म्हणाला,"आंज लगीन घाई लागलिया जनू बा तुंज्या मांगं?काई इशेस?"
श्रीपती आपल्या कल्ल्यापर्यंत पोचलेल्या आकडेबाज मिशीवर पालथा हात फिरवंत म्हणाला,"आरं , काल बाजारला ग्येलो व्हतो तवाधरंनंच मांजा जीव आबाळायेवढा जांलाय बग !आरं , आपला धनी 'शिवाजी राजा आता दोन रोजांतच आबिषेक करुन घ्येत परत्यक्षात राजा हुनार हाय' अशी खबंर दिली बग सवता हंबीरमामा मोहित्यानं मला ! आन् त्ये आईकल्यापासनं मांजं काळीज सुपायेवढं जांलया बग ! त्याच नांदात लय झ्वोकात चालंत आलू रं मर्दा म्यां बाजारातून घरापत्तूर !"
बजाबाला आपल्या म्हातार्‍या बापाचं हसू आलं.जिवा-शिवा या खिल्लारी बैलाची जोडी असलेली बैलगाडी घेऊन बाजाराला गेलेला आपला 'बा' "चालत आलू रं!" म्हणतोय म्हणजे हसायचं नाहीतर काय?

बजाबाला आपल्या बापाची थट्टा करायची लहर आली.तो म्हणाला,"बा, पाय लय दुखलं आस्त्याल न्हाई बैलगाडीतल्या गाडीत चालून्?"आणि आपल्याच या कोटीवर तो गडगडाट करत हसू लागला.त्याचं ते हसणं ऐकून त्याची बायको जनी आणि लेक रखमा परसातून धावत माजघरात आली.त्या दोघींकडे बजाबाचं लक्ष जाईपर्यंत जनी श्रीपतीजवळ वाकली होती आणि गुढग्यात डोकं खुपसून हमसून हमसून रडणार्‍या आपल्या सासर्‍याला म्हणाली,"मामंजी, पर म्यां म्हनीते, आंदी आपली प्वारं जिवा-शिवा इकलासा आन् आता टिपं गाळतासा ! ह्ये समदं कशापायी वं?"
बजाबाचं हसणं गपकन थांबलं.जनीचं बोलणं-बापाचं तोंड खुपसून हमसून रडणं याचा अर्थ त्याच्या रांगड्या टक्कुर्‍यात शिरेपर्यंत काळच जणू थांबला होता. पण जिवा-शिवा या बैलजोडीला विकलं हे विदारक सत्य समजताच बजाबा चवताळ्ला आणि गुरकावत बापाला म्हणाला,"आरं मांज्या द्येवा,ही काय अवदसां आटिवली म्हनायची रं बा तुला? तुला काय कमी पडलं रं म्हून तू ....." आणि मग बजाबानं जीभ चावली.त्याच्या लक्षात आलं की आपली आई त्या आदिलशहाच्या कुण्या एका सरदारानं उचलून नेली, नासवली आणि त्या दु:खाने तिने जीव दिला. नंतर आपल्या याच बापानं रात्रंदिवस मेहेनत करून्,शेती करून आपल्याला वाढवले.जातीचा रामोशी असला तरी श्रीपती शेतकरी होता.त्यामुळे तसंच काहिसं कारण असल्याशिवाय आपला बा असं काही करणार नाही अशी कुठेतरी जाणीव त्याच्या मनाला झाली.कानकोंडं होत तो बापाकडे पाहू लागला.

आपल्या पैरणीच्या बाहीला डोळे पुसून घशातला कढ आवरत श्रीपती म्हणाला,"प्वारांनू,आरं म्यां बी शेतकरीच हाय् न्हवं? शेतकर्‍याला बैल म्हंजी ल्येकरापरीस पिरतीचं ह्ये काय म्यां सांगाया हुवं व्हंय रं तुमास्नी?आरं पर म्यां जिवा-शिवा इकले त्ये मांज्या सुकासाटी न्हाय रं मांज्या ल्येकरांनू! परत्यक्ष आपला धनी -शिवाजी म्हाराज -आता दोन रोजांनी तख्तावर बसनार -त्येला समदी बामनं पुंजापाट करनार - आबिष्येक करनार. म्हंजी ह्ये अक्षी घरचंच कार्य व्हनार म्हना की ! तर् त्यापाई गावच्या पाटलानं गावगन्ना-सिंहासनपट्टी गोळा केलिया.दो मासां आंदी गावच्या त्या म्हादेवाच्या मंदिरात राजाचं पत्तुर आल्येलं पुजार्‍या जोश्यानं वाचून दावलं हुतं.आता तुमी तिंगंबी कालच सूनबाईच्या घरनं तिच्या भावाचं लगीन आटपून आलासा,तवा म्या म्हातार्‍याच्या काय बी टक्कुर्‍यात र्‍हायनां ह्ये बोलायाचं.बरं त्ये आसू जाऊ-म्या ग्येलं दो मास पैका साटवन्याची लई कोशिस क्येली रं पर जमनां ! मंग विलाजच हरला रं सोन्यांनू मांजा आन् काळजाचं त्ये द्वान तुकडं काल बाजरला इकून आलू जालं!"

आपल्या बापाचं हे बोलणं ऐकलं मात्र , आणि बजाबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.तो एकदम चवताळून जात ओरडला,"म्हंजी कालचा पातशहा हुता त्येच्यापरीस ह्यो रांजा जुलमाचा जाला की रं बा! पर म्या म्हनतो, ह्ये आपल्या परजेला आसं नागवं करून तख्तावर कशापाई बसनार हाय रं ह्यो?ह्येच्यापरीस त्यो आदिलशहा पातशहा बरा रं - तख्ती बसनार म्हून वसुली तर करत न्हाई ! आन् ,.." याहीपुढे बोलण्यासाठी तोंडपट्टा चालू असलेल्या बजाबाच्या डोळ्यांपुढे एकदम काजवे चमकले.साठीच्या पुढचा श्रीपती - आपला बा बसल्या जागेवरून उठून आपल्या पुढ्यात आला कधी आणि त्याने आपल्या म्हातार्‍या पण कमावलेल्या शरीराच्या हातांनी फाडकन आपल्या कानाखाली आवाज काढला कधी हे समजेपर्यंत श्रीपतीची आणखीन एक चपराक त्याच्या दुसर्‍या कानाखाली बसली आणि तरणाबांड बजाबा खाली कोलमडला.चार वर्षांची चिमुरडी रखमा भोकाड पसरून रडू लागली.बायको जनी बजाबाला सावरायला पुढे झाली व करवादंत म्हणाली,"अवं बाबा , पर म्या म्हनीते काय चुकलं वं ह्येंचंबी?रीन काडून सन करनारा असा राजा हुवाच कुनाला?" आणि तिनं बजाबाला बसतं केलं.

आता मात्र श्रीपतीला रहावलं नाही.आपल्या दोन हातांनी आपले कान झाकत तो जमिनीवर फतकल मारून बसला आणि म्हणाला,"ह्ये आसलं वंगाळ मांज्या द्येवाबदल - राजाबद्दल आईकन्यापरीस मांजं डोळं का मिटलं न्हाईस रं द्येवा?आरं प्वारा-- सून बाई , या या बजाबाची माय - तिनं जीव दिला तवाधरनं म्या याला माय आन् बाप व्हंत सांबाळला,कंदी नक बी न्हाय लावलं त्येला , त्ये हात आंज उटलं मांजं ! का?म्हाईत हाये?न्हाई ना?मंग आईका तर-, ये रकमे ये, मांजी शानी बाय ती!" असं म्हणंत श्रीपतीने रखमेला जवळ घेतले , तिच डोळे पुसले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तो बोलू लागला,"या चिमन्येयेवडाच व्हता गं तुजा ह्यो धगड्.त्येची माय जीव दिऊन सुटली आन् म्यां अडाकलो.आता काय करावं हा सवाल टक्कुरं फिरवंत व्हता.त्या लांड्या सरदारास्नी इरोद क्येला म्हून रांडंच्यांनी घरदार जाळलं.माज्या शिरपा बैल आन् यशवंती गाईला गोठ्यात जाळलं.घरादाराचा इस्कोट क्येला.म्या तवा पार इसकटलो व्हतो आन् श्येजारच्या आबा द्येशमुकानं सांगितल्यापर्मानं पुनवडीला त्या माऊलीकडं ग्येलो व्हतो.तवा म्या काय बी सांगायच्या आंदीच येका तरन्याबांड प्वारानं-या या बजाबाच्या आताच्या उमरीचाच आसंल बंग त्यो-शिवाजी राजा-त्येनं मांज्या हातात मला आन् ह्येला आशी कापडं दिल्ली आन् सवताच्या श्येजारी बसवून ठिवत मला चटनी भाकार भरवली रं प्वारांनू ! नरड्यांतून घास जाईना रं मांज्या त्यांचं त्ये पिरेम बंगून्.जीव पार घुसमाटला.म्या त्येच्या पायावर घालून घ्याया ग्येलो तं त्येनंच मांजं पाय धरलं रं प्वारांनू आन् म्हनला,"बाबा, आमच्या आया-बहिणींची अब्रू रक्षण करण्याचं व्रत आम्ही घेतलंय.पण अजून म्हणावं तेव्हढं धन्,शस्त्र काहीच आमच्याकडे नाही.त्यामुळे तुमच्या बजाबाच्या आईला आम्ही वाचवू शकलो नाही, म्हणून आम्हीच तुमची माफी मागतो.पण आई भवानीची आम्हांस आण असे बाबा, पुन्हा कुअट्।अल्या बजाबाला पोरकं होऊन द्यायची वेळ येऊन देऊ नयी म्हणून आमचं व्रत आचरण्याचं बळ आम्हांस येण्याचा आशिर्वाद आम्हांस द्या !"

आणि त्या दिवशी रं ल्येकरांनू , रिता गेलेला म्यां रामोशी शेती - घर यापाई थैली अन् पांच सालाची शेतसारा माफी घिऊन भरल्या हातानं परतलू ! आन् त्यो राजा नी त्येची ती जिजाऊ माय कंदी आपलं बैल इकून पैकं मांगल आपल्याकडं आसं कसं रं वाटलं मुर्दाडा तुला?आरं आपल्या कातड्याचं पायतान क्येलं ना तरीबी ह्ये रीन न्हाई रं फिटनार त्येंचं ! त्या मांज्या राजा शिवाजीसाटी म्या बैल इकलं आन् ह्ये धन म्यां सवता द्येनार त्येला न्हिऊन त्या रायगडावं !"

आपल्या बापाचं हे बोलणं ऐकून बजाबा गहिवरला.पण तरी आपण आता शेती कशी करायची?ही शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकत होती.म्हणून भरल्या गळ्यानं तो म्हणाला,"बा, म्यां चुकलो रं ! तुंजं आबाळायेवढं काळीज वळीकलंच न्हांय रं म्यां ! पर बा, शेतकर्‍यानं बैल इकून शेती कशी रं करावी आन् मंग काय खावं रं प्वाटाला?"

आता श्रीपतीला जरा हुरूप आला व तो म्हणाला, "आरं मर्दा, ह्यो तुंज्या रुपानं वहागावानी मांजा ल्योक असल्यावर खायाची चिंता रं कुनाला? आरं त्या राजाचा शिपाय म्हून र्‍हा की तु तथंच रायगडावं त्येच्यापाशी ! आन् म्या बी बगंन काय वरकड काम न्हाय तं जनावरं राखन्याचं काय बाय काम. आरं राजाचं हात मजबूत व्हाया हौवेत रं मर्दा ! उंद्याच्याला रामपार्‍यात आपून समदी जावू रायगडावं आन् राजाला ह्ये आपलं धन द्येवू , त्या माय च्या पायावं सून बाय नी ह्या चिमन्या रकमेला घालून घ्येवू."

आपल्याला आपला राजा बघायला मिळणार म्हणून घटकेपुर्वी रडणारी रखमा आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून खुदुखुदु हसू लागली आणि जनी पण हे बघून सुखावली.आपल्या राजासाठी सर्वस्व लुटून देवून समाधानाने हसणार्‍या त्या घरात तिन्ही सांजेला लक्ष्मी प्रसन्न होत प्रवेशत होती.

श्रीपती आणि बजाबा या सारख्या अनेक गरीब सामान्य बापलेकांना हा राजा आणि हे राज्य आपले आहे असेच वाटले आणि यातच आपल्या या राजाचं महत्व दिसून येते.

राज्याभिषेकाची आवश्यकता

लहानपणापासून शिवरायांनी सामान्य माणसांवरील अन्यायाच्या विरुध्द दंड थोपटले.१६४५ ते १६७४ या ३० वर्षांच्या काळात त्यांना अनेकदा असा अनुभव आला की लोक आपल्याला 'एक बंडखोर सरदार' किंवा 'पुंड-पाळेगार' समजतात.हा असा त्यांचा समज दृढ होण्याची अनेक कारणे होती .त्यातील काही ठळक कारणे व प्रसंग पुढीलप्रमाणे :

१. रांझ्याच्या पाटलाचा न्यायनिवाडा

सामान्य कुणब्याच्या पोरीवर रांझे गावच्या पाटलाने बलात्कार केला.नंतर जननिंदेस घाबरून त्या मुलीने आत्महत्या केली. ही गोष्ट समजताच पाटलाला हजर व्हायला शिवरायांनी आपल्या माणसांकरवी निरोप पाठवला.तेंव्हा तो म्हणाला, "तुमच्या त्या शिवाजीला जाऊन सांगा, तू नावाचा राजा आहेस्-तसा मी कुणी नावाचा पाटील नाही, या गावाचा अधिकारी पाटील आहे.मी या प्रजेला माझी बटीक समजतो." यानंतर त्याला मुसक्या बांधून शिवरायांसमोर हजर करण्यात आले व शिवरायांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा फर्मावली.तेंव्हा पाटील तिथे हजर असलेल्या दादोजी कोंडदेवांना म्हणाला,"पंत, गोतमुखाने न्याय व्हावा!"
त्याच्या या म्हणण्याचा अर्थ शिवरायांच्या मनात घर करून राहिला की,' न्याय करण्याचा अधिकार राजाचा, वरीष्ष्ठ वर्णियांचा-ब्राह्मणांचा किंवा जात/गोत पंचायतीचा.शिवाजी राजा नाही,तो वरीष्ठ वर्णाचा नाही म्हणून त्याला न्याय्निवाडा करण्याचा अधिकार नाही.'

२. जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांचा जबाब

जावळीच्या भौगोलीक महत्वामुळे चंद्रराव मोर्‍यांना आपण जावळीचे अभिषिक्त राजे व सम्राट असल्याचा दंभ निर्माण झाला.त्यावेळी शिवरायांनी त्यांना लिहिलेल्या पत्राला चंद्ररावाने दिलेला जबाब पण शिवरायांच्या मनात घर करून राहिला.चंद्ररावांनी लिहिले होते,

" चंद्रराव ही आमची खिताब ! आम्ही पिढीजात राजे ! तुम्ही काल राजे जाहाला.तुम्हासं राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हंटलियावरी कोण मानितो? येता जावली - जाता गोवली.पुढे येक मनुष्य जिवंत जाणार नाही.तुम्हांमधे पुरुषार्थ असला तर उदईक येणार तर आजच यावे.आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महबळेश्वर ! त्याचे कृपेने राज्य करीतो.आम्हांस श्री चे कृपेने पातशहाने राजे खिताब मोरचेल सिंहासन मेहेरबान होऊन दिधले.आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य जावळीचे करीतो.तुम्ही आम्हांसी खटपट कराल तर तो अपाय होईल.यश न येता अपयशास पात्र होऊन जाल !'

वास्तविक जावळी भागातील आदिलशहाचा सुभेदार दौलतराव - ज्याच्या घराण्याला "चंद्रराव" किताब होता-तो निपुत्रीक मरण पावल्यावर त्याची विधवा बायको आणि आई माणकाई ह्यांच्या सांगण्यावरून शिवरायांनीच शिवथरच्या यशवंतरावांना त्यांच्या कॄष्णाजी,बाजी या दोन मुलांसहीत व मोहना या मुलीसह दत्तक घेवून नवीन चंद्रराव गादीवर आणला होता हेतू हा की, जावळीसारखा दुर्गम भाग वेळप्रसंगी चंद्ररावासह स्वराज्याच्या पाठीशी राहील.पण प्रत्यक्ष आपणास "राजे"पद देणार्‍यास हे आपलेच लोक राजे मानत नाहित असा जीवघेणा कटू अनुभव शिवरायांना आला.

३. एकदा वाड्यावर काही खास प्रसंगानिमित्त शिवरायांनी मानकरी व सरदार यांना आमंत्रणे दिली होती.भोजन समारंभाच्या वेळी शिवरायांसाठी मोठा चौरंग ठेवून त्यावर गादी घातली.दुतर्फा बाकिच्या मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था केली गेली.त्या समारंभास आलेल्या मंडळींमधे मोहिते, महाडीक,शिर्के,निंबाळकर, घाडगे,जाधव आदी सरदार होते.महाराजांसाठी केले उच्चासन पाहून त्यांना विषाद वाटला व त्यापैकी काहीजण म्हणू लागले की,"शिवाजीमहाराजांकडी आता थोरपणा आला काय? आम्ही कदीम, तालेवार सरदार, आम्ही मोरचेलाचे अधिकारी्यांच्या वडिलांस हा अधिकार कधिही प्राप्त झाला नव्हता.असे असता आमची मानहानी करून हे उच्च स्थानी बसणार व आम्ही त्यांच्याजवळ खाली बसणार , हे आम्हांस कमीपणा आणणारे आहे.अशी अमर्यादा करून घेण्यापेक्षा ह्या सदरेस आम्ही बसूच नये हे उत्तम !" असे बोलून ते उठून चालू लागले.तेंव्हा कारभार्‍यांनी त्यांची समजूत घालून प्रत्यक्ष महाराजांशीच बोलण्याचा सल्ला दिला व महाराजांच्या पंगतीचा अवमान न करण्याची विनंती केली.महराजांच्या कानावर हा प्रकार जाताच महाराजांनी त्यातील बहुसंख्य मराठा सरदारांची "ना हरकत" मान्यता घेतलींअंतर घोरपडे, निंबाळकर यांसारख्या मानाच्या सरदारांना एकांती बोलावून त्यांची मर्जी विचारली.त्यावर त्या मानी सरदारांनी असा जबाब दिला की,"आम्ही यवन पादशहांचे पुरातन नोकर्.च्हारपाचशे वर्षांचे जुने सरदार.आम्हाला ही अमर्यादा सहन होणार नाही! तरी याचा विचार तुम्हीच करावा!"यावर महाराजांनी म्हटले,"ज्यांस आपल्या प्रतिष्ठितपणाचा येव्हढा अभिमान वाटत असेल, त्यांनी आमच्या सदरेस येवू नये.कारण पडेल त्यावेळी त्यांस बोलावून आणू.उगाच बखेडा माजविण्याचे कारण नाही.ज्यांस ही व्यवस्था रुचत नसेल त्यांस आम्ही निरोपाचे विडे देवू !" यानंतर ती सदर बरखास्त झाली.

ह्या प्रसंगावरून शिवरायांच्या लक्षात येऊन चुकले की आपल्या पदरच्या मराठे सरदारांना पण आपल्याविषयी विशेष मान्यताबुध्दी नाही.याचे कारण - जुलमी राजवट असली तरी यवन हे अभिस्।इक्त पातशहा आहेत आणि स्वराज्य स्थापन करूनही आपण अभिषिक्त राजे नाही !

४. 'आपल्या या काळात विदेशी यवनांनी आपला देश जुलूम जबरदस्तीने पादाक्रांत केला असून मोंगल , इराणी, तुराणी व पठाण स्वतःला वंशाने व धर्माने उच्च मानतात आणि आपल्या देशातील मुसलमानांनाच तुच्छ मानतात तिथे आपल्या हिंदूंची अवस्था विचारायलाच नको !' ही खंत विचार शिवारायांच्या मनांत वर्षानुवर्षे खदखदत होती!

या सगळ्यांत 'बळी तो कान पिळी' या न्यायाने राज्यकर्ता स्रेष्ठ होता ! त्याने सरंजामदार्-पाटील्-कुलकर्णी-वतनदार्-देशमुख्-जहागिरदार असे आपले हस्तक ठेवावेत - त्यांनी त्या त्या राजाच्या नावावर वसूली करावी , अवाच्या सवा कर वसूल करून वर प्रजेचा अमानुष छळ करावा व राजाला हिस्सा नेवून द्यावा.त्यामुळे सामान्य जनता गरीब माणूस भरडला जात असे.मग तो कोणत्या का धर्माचा वा जातीचा असेना ! "हे थांबवायचे असेल तर आधी ही पाटीलकी-वतनदारी ही मोडून काढतआपलं सामान्य माणसाला दिलासा देणारं सुराज्य-स्वराज्य निर्माण व्हायला हवं "हे शिवरायांनी आपलं ध्येय बनवलं !

मुसलमान राज्यांमधे धर्मसत्ता व राज्यसत्ता एकच आहे परंतू हिंदू राज्यात मात्र राजसत्तेला धर्मशास्त्राचा पाठिंबा मिळणे आवष्यक आहे याची जाणीव शिवरायांना झाली.

वरील कारणांमुळे तसेच "बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात गुप्त घराण्यानंतर हिंदू राजा - शासक मिळाला नव्हता.त्यामुळे हिंदू धर्म सर्रास लयास चालला आहे - तेंव्हा आता धर्मदंडास राजदंडाचं पाठबळ आणि धर्मदंडाच्या बैठकीवर राजदंड प्रस्थापित करणं आवश्यक असल्याचं " उत्तरेतील विश्वेश्वर भट्ट ऊर्फ गागाभट्ट या विद्वान ब्रह्माणाने प्रतिपादन केल्यामुळे , सामान्य जनतेलाही आपल्या या राज्यासाठी आपला राजा असावा अशी प्रबळ इच्छा झाली आणि आपल्या पश्चात् पण आपली रयत सुराज्यात नांदण्यासाठी शिवराय अभिषिक्त राजे झाले !

शिवराज्याभिषेकाचं महत्व व दुरोगामी परिणाम

१. मराठी सत्तेला अधिष्ठान प्राप्त झाले.सिंहासनाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रेरणा व चुरस समस्त मर्‍हाठी जनतेत निर्माण झाली !

२. आता केवळ शिवाजीच्या मृत्यूमुळे यवन सत्ताधीश यांच्या सत्तांपुढे निर्माण झालेले आव्हान विरून जाणे अशक्य झाले.त्यासाठी या सिंहासनावर अधिकार सांगणार्‍या हर एक वंशजाला समूळ नष्ट करणे वा शरण आणणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक झाले.यामुळे सर्वात मोठा हादरा धर्मवेड्या औरंगझेबाला बसला - कारण त्याचे हिंदुस्थानचे इस्लामीकरण करण्याच्या महत्वाकांक्षेला अडसर निर्माण झाला.

३. करारनामे, करवसुली, कर लागू करणे , न्यायदान करणे, शिक्षा करणे , कुठल्याही जातीच्या माणसाला -विशेषतः त्यावेळी उच्च समजल्या जाणार्‍या ब्राह्मणांना शिक्षा वा दंड देणे या सार्‍यांना एक संवैधानिकता प्राप्त झाली.

४. प्रचलित भाषेमधे-प्राकृत मराठी भाषेमधे राज्यव्यवहार सुरू झाला.फारसी भाषा जी सर्वसामान्य माणसांना अवगत नसे ती जाऊन मराठीत व्यवहार सुरू झाला.

शालिवाहन राजाने आपल्या नावाने शक सुरू केला.पण या आमच्या राजाने स्वतःच्या नावाने शक चालू न करता "राज्याभिषेक शक" चालू करून जणू यवनांना व जुलमी माणसांना जी घटना कायम धसका देईल अशा ३०० वर्षांनंतर झालेल्या घटनेला स्वतःपेक्षा जास्त महत्व दिले.

५. राज्याभिषेकामुळे यवन राज्यकर्त्यांव्यतिरिक्त इतर प्रदेशी व्यापारी-डच्-फ्रेंच्-पोर्तुगीज्-इंग्रज- ज्यांनी व्यापाराचं निमित्त करून हिंदुस्थानात प्रवेश मिळवून हातपाय पसरण्याचे प्रयत्न सुरू केले होते त्या सर्वांवर एक वचक निर्माण झाला.

ज्या दिवशी शिवराय छत्रपती झाले तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी ! महाराज बत्तीस मणाच्या अष्टकोनी सुवर्णसिंहासनास पाय न लावता त्यावर आरुढ झाले.महाराज छत्रपती झाले-राजे झाले.राजा म्हणजे नृपती-म्हणजे पृथ्वीचा पती, प्रजेचा पिता-सारी प्रजा त्याची लेकरें !

महाराज आपल्या अभिषिक्त राणी सोयराबाई व युवराज संभाजी यांच्यासह जिजाऊंना नमस्कार करण्यासाठी स्वर्गीय काशीबाई राणीसाहेबांच्या महाली आले.काशीबाईंचा स्वर्गवास झाल्यापासून जिजाऊ माँसाहेब त्यांच्याच महाली राहिल्या होत्या.

जिजाऊ माँसाहेब आता थकल्या होत्यां. नजर पण कमजोर झाली होती.तरी पण श्रवणेंद्रियांना यशवंत, कीर्तीवंत, छत्रपती राजाच्या दमदार पावलांची चाहूल लागलीच ! गुढग्यांना हातांचा आधार देत माँसाहेब उभ्या राहिल्या.मस्तकी सुवर्णाचा मुकुट धारण केलेले राजे जवळ येत चालले आणि पाऊणशे वर्षे वयोमान उलटून गेलेल्या डोळ्यांना धारा लागल्या.समोरचे दृष्य धूसर होत चालले.कानांना दमदार चाहूल लागताच ती माऊली कंबरेत वाकली.शिवरायांना मुजरा करत ती वात्सल्यमूर्ती म्हणाली,"छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा !"

राजांच्या घशातून आवंढा आला.घोगर्‍या स्वरात ते म्हणाले,"माँसाहेब ! आमचा काय अपराध झाला म्हणून आपण आम्हांस असं....." त्यांच्यानं पुढे बोलवेना.ते मटकन खाली बसले.त्यांच्या पाझरणार्‍या डोळ्यांतील ऊष्ण अश्रूंनी जिजाऊंची पावले भिजली.त्यांनी भरल्या डोळ्यांनी धुरकट दिसणार्‍या राजांच्या खांद्यांना धरत त्यांना उठायची खूण केली.राजे उठता उठता त्या म्हणाल्या,"स्वराज्याच्या छत्रपतींना असं कमजोर होऊन कसं चालेल?राजे उठा, तुमची काहीही चूक झालेली नाही.उलट याचसाठी केला होता हा अट्टाहास ! स्वारी आम्हांस म्हणाली होती,"आम्ही कर्नाटकांत संभाजीस मोठ्ठा करू तुम्ही मर्‍हाट राज्यात शिऊबांना मोठ्ठे करा ! बघुया कोण जास्त कीर्तीवंत होतो - जो जास्त कीर्तीवंत होईल त्याचा पालन्कर्ता जिंकला असे समजू ! पण राणी सरकार, रणांगणातच नव्हे तर कधीही हार न आवडणार्‍या आम्हांस याबाबतीत मात्र आमची हारच होईल असे दिसते आहे आणि ही हार मात्र आम्हांस खचितच आवडेल !"
संभाजी कीर्तीवंत होत निघून गेला-स्वारी गेली- आम्ही या आमच्या बोडक्या कपाळानिशी तुमची मिठी सोडवली नाही म्हणून मागे राहिलो ते येकाच स्वप्नापायी ! आमच्या या मर्‍हाट राज्यात उघड्या नागड्या फिरणार्‍या कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस अनाथ होऊ नये-त्याला हकाचा पिता-हकाचं छत्र-छत्रपती मिळावा-ते आम्ही पहावं-स्वारींचं अधुरं स्वप्नं आमच्या डोळ्यांनी पूर्ण होताना बघावं म्हणून ! लेकरा, या स्वराज्यासाठी तुझं पुत्रदान केलं आम्ही ! ते स्वप्न तू आज पुरं केलंस ! आम्ही आमच्या लेकींचा पती पृथ्वीच्या पोटात घातला - तेंव्हाच आमचा माँसाहेब हा अधिकार संपला.तुम्ही तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रच ! तुम्ही कधीही उणं-दुणं वागला नाहीत.आमची रिती ओटी आज भरभरून वाहिली , आपल्या आई-बापाचं स्वप्नं तुम्ही आज पूर्ण केलंत! आज आमचा पुनर्जन्म झाला राजे ! आज तुम्ही प्रजेचे पिता झालात आणि आम्ही पण तुमचे प्रजारुपी लेकरू झालो आणि म्हणून या स्वराज्याची स्वप्नं बघणार्‍या या वेडीनं तो तुम्हांस मुजरा केला !

सारा देश यवनांनी पादाक्रांत केला असताना आपल्या सामान्य जनतेसाठी सामान्य जनतेचं राज्य - स्वराज्य यावं याची स्वप्नं बघत स्वारींनी केलेले इजा-बिजा-तिजा - तीन प्रयत्न फसले.पण तुम्ही ते स्वप्नं पूर्ण केलंत ! आज या त्रिभुवनांत आमच्याएव्हढं कुणी श्रीमंत नसेल राजे ! प्रत्येक कठीण प्रसंगी जीव मुठीत घेवून जिद्दीनं उभ्या राहिलो आम्ही, राजे केवळ या क्षणासाठी की तुम्हांस सांगावं 'स्त्री ही क्षणिक काळची पत्नी आणि काळची माता असते ह्याहीपेक्षा एक त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते म्हणजे छत्रपती हा क्षणिक काळचा सुध्दा स्वतःचा रहात नाही ! तो फक्त प्रजेचा पिता असतो - अनादी अनंत काळापर्यंत !गागाभट्टांनी आमच्या येका गोमट्या मुलांस अभिषेक केला आणि अशा छत्रपतींनी आपल्या नि:स्पृह अश्रूंनी आमच्या चरणांस अभिषेक केला ! आम्ही धन्य झालो राजे, आज हे प्राण तुम्हावरून अखेरचे ओवाळून टाकत आहोत ! स्वतंत्र म्र्‍हाट राज्याच्या स्वराज्याच्या या छत्रपतींना आमचा मानाचा मुजरा !"

......आणि जिजाऊंनी आपले हे अखेरचे शब्दही खरे केले.राज्याभिषेकापासुन बरोब्बर १३ व्या दिवशी - १८ जून १६७४ रोजी चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजत राहिलेल्या जिजाऊ माँसाहेब स्वर्गवासी झाल्या !

माँसाहेब, 'स्वराज्याचा छत्रपती घडवीन' या तुमच्या जिद्दीस एक मुजरा तर त्या स्वप्नपूर्तीनंतर इच्छामरणाने आम्हास सोडून जाण्याच्या तुमच्या अखेरच्या जिद्दीस आमचा त्रिवार मुजरा ! आणि 'याची देही याची डोळां' आपल्या मातेस कुबेराहूनही श्रीमंत करणार्‍या आमच्या छत्रपतींना आमचा आमरण मानाचा मुजरा !

जय भवानी ! जय भारत !

------------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे---------------------------------१६-जून्-२००८-वेळ ००.१६ वा.----------------------------------

आपण आम्हांस इथेही भेटू शकता :

कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ [1]

आणि

कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/ [2]

शिवराज्याभिषेक-३३४ वा वर्धापन दिन !