Tuesday, July 8, 2008

विवाहाची पद्यातली आमंत्रण पत्रिका

तारूण्याच्या उंबरठ्यावर
सुनीत-स्मिताचं स्वप्न
एकमेकांच्या सुखदु:खात
व्हायचंय त्यांना मग्न !
त्यांच्या अशा प्रेमांकुराची
वाढ व्हावी निर्विघ्न ,
म्हणून योजलंय आम्ही चौघांनी
आज त्यांचं लग्न !
दिवस आहे १९ ऑक्टोबर
रविवार आहे सुट्टीचा
मुहुर्त आहे गोरज वेळ
संध्याकाळी सहा चा !
त्यांना द्यायला आशिर्वाद
वेळेवर यायची घ्या दक्षता
एरवी असतात जे रंगीत तांदुळ
तुम्हां हातून होतील अक्षता !
आग्रहाचं हे आमंत्रण
त्याचा न व्हावा अव्हेर
मंगलाष्टकांनी भारुन संध्या
ईडापिडा जाईल बाहेर
तुमचे आमचे संबंध असावेत
जसं मुलीसाठी माहेर
एव्हढं प्रेम सोबत आणा
आणू नका आहेर!
ब्राह्मणांच्या साक्षीनं
वेदमंत्रांच्या घोषात
देव येतील पंगतीला
तुळजा भवानी सह जोशात !
आमच्या घरी येईल सून
पूर्ण करील कुटुंब
"नांदा सौख्य भरे" चे
आशिर्वाद घेऊन तुडुंब !
नवी माणसं नवी नाती
जुळतील नवे संबंध
तुमच्या येण्याने दृढ होतील
आपले सार्‍यांचे ऋणानुबंध !

रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर.....एक झलक.....

बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले !
आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?"
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्‍या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....."
राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....

---------------------------------------------------------------------------------
उदय गंगाधर सप्रे लिखित "रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर" या आगामी पुस्तकातून सप्रेम