Monday, April 7, 2008

ही पण "श्रीं" ची च इच्छा !



रसिक वाचक,"सप्रे"म नमस्कार ! आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३२८ वी पुण्यतिथी ! या निमित्ताने , माझ्या आगामी "झंझावात" या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे."माणसात पण देवत्वाचा अंश असतो" हे ग.दि.मां ई आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे :
ज्ञानियांचा वा तुक्याचा
तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात थोडा
ईश्वराचा अंश आहे !
आजच्या या रसातळाला चाललेल्या "आरक्षण" रूपी आमिषांनी आपली तुंबडी भरणार्‍या राजकारणी जमान्यात , शिवराय , तुमची खूप कमतरता भासते !
तुमच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !
जीवाशी खेळताना प्रत्येक क्षणी,
मातृभूमीसाठी लावताना बाजी
नसांनसांत दौडत जाते -
ती वृत्तीम्हणजेच छत्रपती शिवाजी !--------------------------------------------

माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३२८ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे - "आत्मा बोलतो" यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३७८ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !त्याआधी आम्ही तुम्हांस ३२८ वर्षे मागे नेतो.....
आज चैत्री पौर्णिमा - रामभक्त हनुमानाची जयंती - म्हणजे तुमच्या आजकालच्या "इंग्रजा"ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला "पोरका" समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विष्वल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !
ग्लानी येत्येय पण डोळ्यांसमोर दिसतोय दख्खनेत उतरण्याची तयारी करणारा आलम् गीर ! दक्षिणेत यायच्या तयारीत असलेला एक वेडा पीर ! सम्पूर्ण मुघल खानदान तैमूरलंगापासऊन इथे आलं.त्यांना फक्त ही भूमी जिंकायची जमीन वाटली , मातेच्या नाळेचा आणि बाळाचा संबंध जणु यांना ठावेच नाही ! आम्ही ही भूमीच आमची माता मानली ! बहुसंख्य हिंदू असलेल्या या भूमीत हिंदुंची देवळे पाडली गेली, इथल्या मुसलमानांना सुध्दा मुघलांनी दुय्यमच वागणूक दिली, स्त्रियांची अब्रू चव्हाट्यावर येत होती ! हे सर्व थांबविण्याच्या निर्धाराने आम्ही वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वरी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली ! फक्त शपथ घेतली - काही लेखकांनी लिहिल्याप्रमाणे "करंगळी" वगैरे काही कापली नाही - वृथा रक्त सांडण्याची शिकवण आम्हांस ना जिजाऊ मॉसाहेबांनी दिली ना आम्ही "गनिमी कावा" ज्यांच्याकडून शिकलो त्या आमच्या महाराजसाहेबांनी आम्हाला ही शिकवण दिली !



कफल्लक अवस्थेतून सुरुवात करून गेल्या पस्तीस वर्षांत जे कमावलं ते एव्हढ्याचसाठी की आज ना उद्या दिलीश्वर दक्षिणेत येणार आणि त्याला तोंड द्यायचं तर पदरी पुरेसे सैन्य, मुबलक शस्त्रं, धन आणि किल्ले हवेत ! आजमितीस ३६० किल्ले राज्यास जोडले."एक एक किल्ला एक एक वर्ष लढवला तरी आलम् गीर ला ३६० वर्षे लागतील दख्खन जिंकायला"हा आत्मविश्वास होता अगदी गेल्या अकरा दिवसांपूर्वीपर्यंत्.पण राज्य लालसेने जे मुघल राज्यकर्त्यांनी केले ते प्रत्यक्ष रायगडावर महाराणींनी करताना पाहून कलेजा फाटून गेला, येणार्‍या काळात उद्याच्या छत्रपतींना-म्हणजेच पर्यायाने शंभुराजांना एक शत्रु घरात आणि एक दारात असे युध्द खेळावे लागणार असे दिसते.राजारामांच्या लग्नानंतर आठ नहाणाच्या "मेजवानी" ने आम्हाला हा "दृष्टांत" दिला आहे .....
राजारामाच्या लग्नाचं आमंत्रण अभिषिक्त राणी असूनदेखील ज्यांना "राजमाता" बनता आलं नाही त्या सोयराबाई राणीसाहेबांनी युवराज संभाजी आणि येसुबाई यांना मुद्दाम दिलं नाही ! अर्थात् यातही आम्ही युवराजांसाठी नियतीने लिहून ठेवलेला धोक्याचा इशाराच पाहिला.दूरदृष्टी आताशा आम्हास एक शापच वाटते ती याच कारणाने - कारण जे आम्ही बघतो ते आमच्या अष्टप्रधान मंडळातील एकालाही आमच्या बरोबरीने दिसत नाही.
युवराज शंभुराजे वयाच्या आठव्या वर्षी मोंगली मनसबदार झाले, आग्र्याहून सुटका झाल्यावर आम्ही पुढे निघून आलो तेंव्हा ते धैर्याने कृष्णाजीपंतांकडे मथुरेस राहिले ! त्यांच्या जिवंतपणी आम्हास त्यांचे दिवस घालावे लागले आलम् गीर ची दिशाभूल करण्यासाठी , पण ह्यांनी त्याबध्दल एका शब्दानेही आम्हास आजतागायत काही म्हटले नाही.त्यांची बुध्दी तेज आहे, आम्ही रायगडी असता रामराजांच्या-होय्-राजारामास ते राम्राजेच म्हणतात्-तर रामराजांच्या लग्नाला बोलावणे नाही यामागचा "ना" बोलविता धनी कोण हे ओळखण्याइतकी त्यांची बुध्दी नक्कीच तेज आहे.प्रत्यक्ष आमची आज्ञा डावलली जाते यामागचे राजकारण त्यांच्या नकीच लक्षात येईल्.कारण आम्ही कितीही रागावलो असलो तरी राम-भरता प्रमाणे असणार्‍या या बंधूंच्या जोडीस आमचे नेहेमीच आशीर्वाद असतील हे युवराज जाणतात !
हे "श्रीं"चं राज्य - स्वराज्य निर्माण करत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असणार्‍या माणसांना आमचा राज्याभिषेक होताच यशातील आपला हिस्सा व हक्क दिसू लागला.बाळाजी आवजी,अणाजी दत्तो ते मोरोपंतांपर्यंत सर्वांनी - एक हंबीरराव वगळता , सिंहासनाची पिढीजात सेवा आमच्याकडून मंजूर करून घेतली.आमच्या राज्याभिषेकानंतर खुद्द महाराणी साहेबांना सुध्दा "अभिषिक्त"पणाची धुंदी चढली.दहा वर्षाच्या अशक्तम् दुर्बलम् पोराकडे राज्याचा भावी छत्रपती म्हणून बघण्याएव्हढी त्या धुंदीमुळे त्यांची नजर वहावत गेली.आणि यासाठी पठिंबा कुणाचा ? - तर राज्याचे सुरनवीस - अण्णाजी दत्तो यांचा ! अण्णाजेंसारखा मुरब्बी राजकारणी सुध्दा जनानी राजकारणाला बळी पडावा ना?
अण्णाजींकडे माहेरपणाला आलेल्या त्यांच्या मुलीच्या - गोदावरीच्या "न" गेलेल्या अब्रूबध्दल युवराजांनी ती अब्रू घेतली असे संशयाचे भूत अण्णाजी आणि त्यांचे कुटुंब सरस्वतीबाई यांच्या मनात भरवून देण्याची थोर कूटनीती महाराणींनी वापरली.युवराजांचा न्याय करण्यासाठी केलेल्या चौकशीचा दिवस अजून आठवतो .....हातीपायी बेड्या घातलेले युवराज आरोपानंतर बेडरपणे आमच्या डोळ्यांस डोळा भिडवून आम्हांस म्हणाले,"आम्ही बाईंना आमच्या अखत्यारीत लिंगाण्यावर कैदेत ठेवले आहे.कारण प्रत्यक्ष आमच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न या रायगडावरील काही प्रतिष्ठित मंडळी करीत आहेत याचा सुगावा आम्हांस लागला होता.आमच्या निरपराध पणाची साक्ष आपण बाईंना इथे बोलावून आणून घ्यावी एव्ह्ढीच आमची आपल्या पायाशी विनंती आहे !"आम्ही मोरोपंतांस लिंगाण्यावर धाडले बाईंना सन्मानपूर्वक घेवून येण्यासाठी.पण तत्पूर्वी आम्ही जेंव्हा विचारले ,"कोण प्रतिष्ठित मंडळी हा प्रयत्न करताहेत?" , तेंव्हा राणीवशाकडे एकवार जळजळीत नजर टा़कून युव्राजांनी मान खाली घालत एव्हढेच म्हटले,"माफी असावी पण , ती नावे या भर सभेत घेण्याएव्हढी आमची पायरी नाही!"तिकडे ती निष्पाप पोर- "निरपराध युवराजांवर आपली "न" घेतलेली अब्रू घेतल्याचा खोटा आरोप करावा तर आपलीच अब्रू चव्हाट्यावर येते आणि न करावा तर प्रत्यक्ष जन्मदात्या आई-बापांवर खोटे आरोप्-ते ही प्रत्यक्ष युवराजांवर केल्याचे पातक लागते!" या द्वीधा मनःस्थितीत सापडली आणि तिने लिंगाण्यावरून स्वतःस खाली लोटून देऊन यातून सुटका करून घेतली.पण न केलेल्या गुन्ह्याबध्दलचा युवराजांवरील संशय लोकांच्या मनात दृढ करून आणि आंधळ्या पुत्रप्रेमाची वावटळ आमच्या विरुध्द इतिहासात कायमची नोंद करुन गोदावरी गेली ! या धक्क्यातून पुढे सरस्वतीबाई पण सावरु शकल्या नाहित आणि त्या ही गोदावरीपाठोपाठ काहे दिवसांतच निजधामांस गेल्या ! या सगळ्यांमुळे अण्णाजींच्या मनांत मात्र युवराजांच्याविरुध्द कायमची अढी निर्माण झाली .ज्या "स्त्री" च्या शीलाचे रक्षण करण्यासाठी आम्ही हे स्वराज्य निर्माण केले, त्याच स्वराज्याच्या सिंहासनासाठी प्रत्यक्ष महाराणींनी-एका स्त्रीनेच एका स्त्रीच्या शीलाचे भांडवल करून युव्राजांचे चारित्र्यहनन केले आणि प्रत्यक्ष छत्रपतींची निष्कलंक न्यायाची कारकीर्द कलंकीत केली - इतकी की तो अविश्वास अण्णाजींच्या नजरेत आम्हांस आमरण पहावा लागला ! यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते?
आम्ही आजारी पडल्यावर आणि आम्हांस आमचे भवितव्य दिसावयास लागताच आम्ही बाळाजी आवजींना पन्हाळ्यावर युवराजांना आमच्या आजारपणाबध्दल कळवायला सांगून बुलावा धाडण्याचा खलिता लिहावयास सांगितला होता. पण मधे आठ दिवस जाऊन पण युवराज आले का नाहित असे विचरताच महाराणी साहेबांचे ठसक्यात उत्तर आले,"इकडच्या स्वारींबध्दल इतकी काळजी असती तर गेलेच असते कशाला ते दिलेरखानाकडे निघून?".आम्ही पुतळाबाईसाहेबांना पालखी पाठवून गडाखालून बोलावून घेण्यास सांगितले होते, त्याही आल्या नाहित , यावर पण महाराणी साहेबांनी सांगितले,"इकडचा महालच आजारी आहे !"
"आदिलशाही, कुतुबशाही आणि मोघल आलम् गीर या सारख्या बलाढ्य सत्तांना काबूत ठेवणार्‍या छत्रपतींना आपल्या लोणकढी थापा कळल्या नाहित" या भ्रमात रहाणार्‍या अतिसामान्य बुध्दीच्या बाईस महाराणीपद मिळावे यासाठीच का परमेश्वरा तू सईबाईंना आमच्यापासून दूर नेलेस?
हंबीरराव, राजाराम, युवराज आणि येसुबाई यांचा अपवाद वगळता सर्वच लोकांची निष्ठा राज्याच्या ऐवजी राजाच्या - आमच्याच ठायी असावी? य सार्‍या लोकांना आमचे अफझल वधाच्या वेळी भेटीस जातानाची आमचे निर्वाणीचे बोल का आठवले नाहित , कधीच? आम्हास आजही लख्ख आठवते, आम्ही म्हणालो होतो,"आम्ही तो खानाच्या भेटीस निघालो, खानांस मारूनच स्वराज्य तरणे आहे ! पण ये कामी जर आम्ही नाकामयाब होऊन मारले जातो, तर मरता मरता हे समाधान असेल की स्वराज्य रक्षणासाठी जीव जातो आहे.मागे उरलेल्यांनी शोक करू नये, छोट्या शंभुबाळास मॉसाहेबांच्या मांडीवर ठेवून त्यांच्या सल्ल्याने स्वराज्य राखणे ! एक शिवाजी गेला तरी चालेल , पण स्वराज्य संपता नये, तुमच्या निष्ठा स्वराज्याशी ठेवा शिवाजीशी नाही !"
हंबीरराव्-एक नि:स्पृह सेनापती-सरनौबत ! नेसरीच्या खिंडीत जेंव्हा प्रतापराव मारले गेले तेंव्हा सरनौबतपदासाठी आनंदरावांचे नांव पुढे आले.पण सैन्य निर्नायकी राहू नये म्हणून धैर्याने सैन्याची देखरेख करत थांबलेले "हंसाजी मोहिते" हेच सरनौबत पदासाठी अधिक योग्य आहेत असे ठामपणे फक्त आम्हा व्यतिरिक्त युवराजांनीच सांगितले होते. हंसाजी मामा - हंबीरराव या किताबासहीत सरनौबत झाले ! वास्तविक होऊ घात असलेल्या भावी महाराणींचा भाऊ म्हणून त्यांनी कधीच लाळघोटेपणा केला नाही , आणि आमची खात्री आहे - त्यांच्या निष्ठा स्वराज्याशी आहेत !
राजाराम - तो तर एक अशक्त मुलगा ! महाराणींच्या वटारलेल्या डोळ्यांत विरघळून जाणारे त्यांचे धैर्य आलम् गीर ला थोपवू शकेल काय?नि:संशय नाही, त्रिवार नाही ! हां एक मात्र खरं की राजारामाच्या निष्ठा सत्याच्या बाजूने आहेत - महाराणी नसताना ती चमक आम्ही त्यांच्या डोळ्यांत पाहिली अहे ! त्यांना सत्तेची हाव नाही, नव्हे तेव्हढी आपली कुवतच नाही हे ही ते जाणतात ! या "राम्"राजाचे हे "भरत"प्रेम त्यांच्या दादामहाराज अर्थात् शंभुराजांसाठी असेच कायम राहो हीच "श्रीं"च्या चरणी प्रार्थना !
शंभुराजे - एक निर्भीड - लखलखतं धारदार अस्र ! पण राज्याच्या जनानी हव्यासापायी रक्तबंबाळ झालेले एक दुर्दैवी युवराज ! आमच्या ज्या अष्टप्रधानांना वंशपरंपरागत "सेवा" हवी आहे त्यांनाच "केवळ मोठे युवराज म्हणून काही भावी छत्रपती म्हणून योग्यता सिध्द होत नाही, वंशपरंपरेने का राजाचे अधिकार द्यायचे असतात?" म्हणून युवराज भावी छत्रपती म्हणून नको आहेत.
येसुबाई- ही एकच पोर अशी आहे की जी मॉसाहेबांनंतर "राजमाता" होण्याची योग्यता आणि वकूब अंगी बाळगून आहे.आणि म्हणूनच आमची "शिक्के कट्यार" तिच्या हाती सुपूर्द करताना आम्हांस जराही संदेह वाटला नाहे.पण या शिक्के कट्यारीनेच महाराणी साहेबांचा स्त्री मत्सर जागा केला आणि वेळप्रसंगी कट्यार पण काय करील अश्या वाग्बाणांनी महाराणींनी तुम्हांस आणि पुतळाबाई राणीसाहेबांस बेजार केले, कारण त्या एकट्याच तुम्हांस समजावून घेऊ शकतात ! या शंभुबाळासारखा धगधगता "अंगार" पदरात बाळगण्याचं आणि सांभाळण्याचं धैर्य आई भवानी तुम्हांस देवो !
दिलेरखानाला जाऊन मिळालेले शंभुराजे स्वराज्यात परत आले पण भूपाळगडाच्या सातशे निरपराध लोकांच्या थोट्या केलेल्या उजव्या हातांचा आणि अथणीच्या शेकडो निरपराध लोकांच्या गेलेल्या जीवांचा कलंक माथी घेवूनच ! आयुष्यात केलेल्या या एकमेव मोठ्ठ्या चुकीने वयाच्या आठव्या वर्षांपासून केलेले पराक्रम आणि दाखवलेले धैर्य आणि शौर्य एका क्षणांत हे अष्टप्रधान मंडळ विसरले ! या सार्‍या लोकांच्या अक्षम्य चुका आम्ही कायम पदरात घातल्या, पण "शंभुबाळ, राजाला चुकून पण चुकता नाही येत हे ध्यानी धरा !"वेळ पडली तर एकच कांय पण असले छप्पन्न आलम् गीर या दख्खनमधे गाडण्याचं सामर्थ्य तुझ्या मनगटात आहे रे पोरा ! पण राजाने भावनाप्रधान , कवी मनाचे असून नाही चालत ! राजाला धूर्त आणि कावेबाजच असावं लागतं ! "तळे राखी तो पाणी चाखी" या उक्तीप्रमाणे अण्णाजी वा इतर मंत्र्यांनी केलेले गैरव्यवहार नजर अंदाज करण्याचं धोरणीपण जे आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे नाही, मनांत आलेले विचार चेहेर्‍यावर दिसू न देण्याची लबाडी तुमच्याकडे नाही,आवडेल त्यावर जान निछावर करणारे जिगर घेवून तुम्ही जन्माला आलात पण तुमचं जन्म घेण्याचं घराणंच चुकलं युवराज ! कुठल्या सरदाराच्या घरी जन्मांस येतात तर आम्ही तुम्हांस डोईवर घेण्याचेच बाकी ठेवले असते इतके उच्च प्रतीचे तुमचे सर्व गुण, पण आमच्या - या छत्रपतींच्या पोटी जन्मलात आणि तेही थोरले होऊन हाच तुमचा सर्वांत मोठा अवगुण युवराज !
सगळं काळंबेरं ओळखून पण शांतपणे आणि धोरणीपणे वागता यायला वयाची पन्नाशी यावी लागते युवराज ! पण दुर्दैवाने तुम्हासं तेव्हढा अवधी नाही, कारण आलम् गीर दाराशी उभा ठाकेल तेंव्हा दारांत एक आणि घरातच अनेक अश्या शत्रूंशी तुम्हांस लढावं लागेल आणि आमचं दुर्दैव की आम्ही अश्या वेळी तुमच्या पाठीशी रहाण्यासाठी या जगांत नसू !तरूणपणी संतापाच्या भरांत जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांच्या मुलांना मारण्याचे असंयमी कृत्य आम्हीही केलंच की ! आग्र्यास "आम्हांस जास्तीत जास्त भडकावून कैदेत डांबण्याएव्हढी आगळीक आमच्याकडून घडावी "यासाठी आलम् गीर प्रयत्नशील आहे हे ओळखून पण आम्ही भर दरबारांतून पाठ फिरवून येण्याची घोडचूक केलीच ना? "श्रीं" च्या कृपेने आपण सारेच यातून सुटलो पण कित्येक निरपराध जीवांची गुंतवणूक त्यावेळी आम्ही नाहक केल्याची रुखरुख अजून मनातून जात नाही !
आज बाहेर जगदीश्वराच्या मंदिरात महा मृत्युंजयाच्या जपांस ब्राह्मण बसलेत ! यांना कसे समजावणार की आज हनुमान जयंती- रामाच्या दासाची जयंती- आजच रामाच्या दासाच्या - समर्थ रामदासांचे कृपाभिलाषी छत्रपतींनी हा नश्वर देह टाकून निर्वाण करावे हे योग्य नव्हे कांय?आणि अशा जपांनी जर मृत्यू थांबता , तर आज सईबाईसाहेब "महाराणी" नसत्या काय? दादोजी - महाराज साहेब्-बाजी काका पासलकर्-कान्होजी जेधे -बाजीप्रभू देशपांडे-मुरारबाजी-तानाजी-काशीबाई राणीसाहेब्-मॉसाहेब यांना आम्ही जाऊ दिले असते कांय? "आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी जपाच्या माळेचा नव्हे तर धनुष्याचा दोराच सहाय्य करील" हे या देवभोळ्या माणसांना कळले पण वळले मात्र कधीच नाही !
आमचा लढा मानवता विरोधी हर एक दुष्टाशी होता , कुठल्याही धर्माशी आम्ही कधीच वैर केले नाही ! सामान्य माणूस मानाने जगू शकेल असा त्याच्या "स्व"तःच्या मनात विश्वास उत्पन्न करेल तेच ना स्वराज्य?नपेक्षा आम्ही याकूतबाबा , शहा शरीफ्,मौनी बाबा,रामदास स्वामी,तुकाराम महाराज या सार्‍या संतांच्या चरणी लीन झालो असतो काय? आणि नपेक्षा धर्माने "इस्लाम" चे बंदे असलेले सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहीम्,नूर बेग, काझी साहेब या सार्‍यांनी स्वराज्याशी ईमान वाहिलं असतं का?
पैलतीर दिसत असताना याक्षणी जगायची ही ऊर्मी का मनात दाटून येत्येय? जगायची हाव म्हणून्?निश्चीतच नाही ! तर आलम् गीर सारख्या बलाढ्य शत्रूला नामोहरम करणार्‍या माझ्या या बछड्याची -युवराज संभाजी ची कीर्ती दिगदिगंत पोचलेली पहाण्यासाठी आणि विजयी होवून आलेल्या त्या वीराला आमच्या नेत्रांनी औक्षण करण्यासाठी ! त्या क्षणी आमच्या तेजाळलेल्या नेत्रांत बघून या सार्‍या अलम् दुनियेला खात्री पटेल की शिवाजीने फक्त स्वराज्य नाहे घडवलं तर ते स्वराज्य राखण्यासाठी दैदिप्यमान धगधगत्या अंगाराची मशाल आपल्या युवराजांच्या रूपाने या हिंदवी स्वराज्यासाठी-या राष्ट्रासाठी जळत ठेवली आहे !
वडिलांचा अंत्यसमयी पुत्र पित्याच्या जवळ नसावा हा "भोसले" घ्राण्याला शापच आहे ! हे राज्य व्हावे ही "श्रीं" ची इच्छा होती आणि ती टिकवणारा भवानीचा भुत्या भविष्यात स्वराज्याचा पोत पाजळत जग उजळून टाकेल ! पण आजमितीस , अंगाची लाही लाही होत असताना शेवटचा श्वास घेण्यासाठी स्वराज्याच्या छत्रपतींना तुझ्यासारख्या महापराक्रमी आणि निर्मळ मनाच्या युवराजाची मांडी नसावी, ही पण "श्रीं" ची च इच्छा ! जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी हजारो जीवांची गुंतवणूक झाली, त्या जीवांचा सौदागर आपल्या सग्या सोयर्‍यांकडे भेटीला निघाला असताना, त्याची गुंतवणूक ज्या जीवात झाली आहे त्या स्वराज्याचा भावी तारणहार, राखणदार - आलम् गीर ला आव्हान देऊ शकणारा आणि ते समर्थपणे पेलण्याची ताकद अंगी बाणून असणारा "छावा" नजरेआड असावा आणि त्याची वाट पहाणारे हे दोन डोळे पन्हाळ्याकडे पहात पहात निष्प्राण व्हावेत ही पण "श्रीं" ची च इच्छा !

4 comments:

Unknown said...

Kadhi yetey hi kadambari??

Uttam bhashashaili......

uday sapre said...

hee kadambari yayla ajun 2 warshe taree jaatil ase diste , mulga 10 th la janaar aahe yanda (mhanje meech !) tyamule ya warshe kahi likhan hoil ase watat nahiye !

abhiprayabadhdhal ABHAAR !

Uday SAPREm

Unknown said...

Khup sunder wichar ahe wyakti nishte peksha , desh, rajya nishta mahtwachi hi shiwajinchi talmal kadhi kunala kalli nahi. shivaji janmawa pan dusryachay ghari........

marathi mansachi wichar prawrutti jewha badlel to sudin.

Abhi said...

लवकरात लवकर आपली कादांबरी यावी ही सदिच्छा
आपला नम्र
अभी