तारूण्याच्या उंबरठ्यावर
सुनीत-स्मिताचं स्वप्न
एकमेकांच्या सुखदु:खात
व्हायचंय त्यांना मग्न !
त्यांच्या अशा प्रेमांकुराची
वाढ व्हावी निर्विघ्न ,
म्हणून योजलंय आम्ही चौघांनी
आज त्यांचं लग्न !
दिवस आहे १९ ऑक्टोबर
रविवार आहे सुट्टीचा
मुहुर्त आहे गोरज वेळ
संध्याकाळी सहा चा !
त्यांना द्यायला आशिर्वाद
वेळेवर यायची घ्या दक्षता
एरवी असतात जे रंगीत तांदुळ
तुम्हां हातून होतील अक्षता !
आग्रहाचं हे आमंत्रण
त्याचा न व्हावा अव्हेर
मंगलाष्टकांनी भारुन संध्या
ईडापिडा जाईल बाहेर
तुमचे आमचे संबंध असावेत
जसं मुलीसाठी माहेर
एव्हढं प्रेम सोबत आणा
आणू नका आहेर!
ब्राह्मणांच्या साक्षीनं
वेदमंत्रांच्या घोषात
देव येतील पंगतीला
तुळजा भवानी सह जोशात !
आमच्या घरी येईल सून
पूर्ण करील कुटुंब
"नांदा सौख्य भरे" चे
आशिर्वाद घेऊन तुडुंब !
नवी माणसं नवी नाती
जुळतील नवे संबंध
तुमच्या येण्याने दृढ होतील
आपले सार्यांचे ऋणानुबंध !
Tuesday, July 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment