३ एप्रिल हा छत्रपतींचा निर्वाण दिन ! त्या पुण्यश्लोक छत्रपतींचे हे पुण्यस्मरण ! काय वाटत असेल आज त्यांना ? ही कल्पना मांडणारा हा लेख .....
उदय गंगाधर सप्रेमअर्पण.....
आज ३ एप्रिल २००९ ! या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे / तारखेप्रमाणे आजपासून ३२९ वर्षांपूर्वी.....
शिवरायांचे स्वगत :
आज हनुमान जयंती - चैत्र शुध्द पौर्णिमा !
महाराज साहेब , आऊसाहेब , सई , काशिबाई.....आज आम्ही तुमच्या भेटीस निघालो.मगाशीच सर्वांशी निरवानिरव करुन झाली.सोयराबाई राणीसाहेब यांनी अशक्तम दुर्बलम अशा राजारामाच्या गुढग्याला छत्रपतीपदाचं बाशिंग बांधून ठेवलंय! आमचे सारे निरोप व खलिते - शंभूबाळांसाठी धाडलेले - रायगड उतरलेच नाहीत ! बाळाजींनी मघा नजर चुकवली , खलिते "पाठवले" म्हणाले ! अरे , दिलेरखानांस मिळून झाल्यानंतर , स्वराज्याचा खातमा होईल - आबासाहेबांच्या मनिषेच्या नरड्यालाच नख लागेल हे उशिराने लक्षात येतांच आपली चूक पदरांत घेण्याच्या विनंतीसह "आम्हांस साहेबी पायांची जोड आहे , आम्ही दूधभात खाऊन साहेबांच्या पायांचे चिंतन करून राहीन !" असे निष्कपटपणे आणि नि:स्वार्थीपणे सांगणारे शंभूराजे "आम्ही अत्यवस्थ आहोत !" असं कळल्यावरही पन्हाळा सोडून आम्हांकडे येणार नाहीत - या गोष्टीवर - एका वेळी तीन तीन बलाढ्य अश्या पादशाह्यांशी झुंजणारे छत्रपती विश्वास ठेवतील असे वाटणार्या सोयराबाईंच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते !
पुतळाबाई राणीसाहेबांस बोलावणे पाठवले तर "त्या स्वतःच आजारी आहेत" असं महाराणी सोयराबाई म्हणाल्या ! मूर्तीमंत वात्सल्याचा पुतळा असणार्या पुतळाबाई - स्वतः अत्यवस्थ असल्या तरी आमच्यासाठी यमराजांसही थांबावयांस सांगून आमच्या सेवेला धावत येतील हे काय आम्ही जाणत नाही?पुतळाबाई - ज्यांनी अहेवपणी गेलेल्या सईबाईंची हळदी कुंकवाची कोयरी - जी सोयराबाईंनी नाकारली - ती आजपावेतो जपली.....आम्ही आपले अनंत अपराधी आहोत पुतळा ! आपला दिल जाणून पण आम्ही आपल्या वाट्यास आलो नाही ! आम्ही "स्व"त्व विसरून स्वराज्य निर्माण केलं , पण हे "स्व"जनांनीच कलंकीत केलं !
गेली ३५ वर्षे अविरत हाकलेला हा स्वराज्यरथ - ज्याचा मी सारथी - तो मी पण आज कर्णासारखाच विवश ! त्याचं चाक धरेनं गिळलं , आमच्या स्वराज्य रथांस राज्याच्या असुरी लालसेनं ! जीवांस जीव देणारे हंबीरराव - त्यांस जाणूनबुजून महाराणींनी लांब धाडून दिले.....जे स्वराज्य घडविण्यात आम्ही आमची अख्खी जिंदगी खर्ची घातली , त्याचे आम्ही "राजे" होतांच एकमेव हंबीरराव सोडता समस्त अष्टप्रधान मंडळाला वंशपरंपरागत अधिकाराची हाव सुटावी? आणि सख्खी बहीण महाराणी असताना कुठलीच अपेक्षा न बाळगणार्या हंबीररावांच्या पाठच्या बहीणीने मात्र राज्यलालसा धरावी हा कुठला दैवदिर्विलास स्वराज्याच्या ललाटी लिहिलास रे शंभूमहादेवा ? बरे राज्यलालसा पण एकवेळ समजू शकतो , पण आजपावेतो अफूच्या मेहेरबानीवर गुंगीत ठेवलेल्या आपल्या जेमतेम १० वर्षे वयाच्या राजारामाला - स्वराज्याच्या वेशीवर दस्तक देणारा औरंगझेब आटपेल असं सोयराबाईंना वाटल्यांस नवल नाही पण या जनानी बुध्दीत बाळाजी आवजींसकट सार्यांचीच बुध्दी वाहून जाण्याएवढे का स्वराज्य वांझ ठरावे?
हे मृत्यो , आम्ही तुझे स्वागत करतो , ये ! समर्थ रामदांस - ज्यांनी आयुष्यभर ज्या हनुमंताची देवळे ये देशी स्थापिली , त्या रामाच्या दासाची आज जयंती ! आजच्या एव्हढा दुसरा कुठला मुहुर्त आपणाकडे येण्यांस योग्य असेल स्वामीजी? थोडा अवधी अजून देतांस हे मृत्यो , तर या जगांस आम्ही दाखवून दिले असते की आम्ही फक्त स्वराज्य निर्माण नाही केले तर ते राखणारे शंभूसारखे भावी छत्रपती पण घडविले ! पण आजन्म जे केले नाही ते आजाच आम्ही का करावे?आजच तुझ्याकडून अवधीची भिक्षा का मागावी?हे श्रीं चे राज्य घडले - या राज्यरूपी मडक्याच्या या कुंभाराच्या देहाची माती - हे स्वराज्यभूमी - हे माते , आम्हीच तुला अर्पण करतो ! देणार्या हतांनी अखेरीसही देतच रहावे नाही का - महारथी कर्णासारखे? ये मृत्यो , ये.....जननी जन्मभूमीच्.....जय भवानी !
आणि आता , आज , या घडीला ३२९ वर्षांनंतर , महाराष्ट्राच्या अवतीभवती घुटमळणार्या छत्रपतींच्या आत्म्याचे हे पण एक स्वगत.....
तलवार घेऊनी हाती
केले दीन दुबळ्यांचे रक्षण
तोच माझा वीर मराठा
मागत का फिरतो "आरक्षण" ?
मनगटांत असतां धमक
बुध्दीची अपूर्व शक्ती
"वापरांत दोन्ही नसणे"
याचेच असे हे लक्षण !
यांचसाठी झुंजलो का मी?
अन् आले कितीक कामी
पुत्रा "नागोजी" गमवून सुध्दा
करते "बाजी"स कांता औक्षण !
रानी हिंडलो धडपडलो
इतिहास घडविण्यासाठी
अन् राहिलो पुस्तकांमधुनी
देण्या बाळपणीचे शिक्षण !
मी संपलो होतो केंव्हाचा
आत्म्याची होती कण कण ,
बघुनी आजचे राजकारण
मी पुन्हा संपलो.....ये क्षण ! .....
मी पुन्हा संपलो.....ये क्षण ! .....
मी पुन्हा संपलो.....ये क्षण !
Thursday, May 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
शिवरायांची तळमळ साफ दिसते..... ही कमेंट टाकण्यावाचून आपण काही करू शकत नाही ह्याचं दु:ख आणि लाजही !
Apratim... Atishay surekh lihil aahet aapaN. Shivray kharokhar ch bolate tar te kahise asech bolale asate..
tumaache lekh apratim ahet .je mla aavdatat te lekh mi mazya mitrana mail karte.thanks for good information.
Post a Comment